तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह तालुक्यात विविध व्यापारी आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वजन काटे व इलेक्ट्रॉनिक मापन यंत्रांच्या तपासणीकडे मापनशास्त्र विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे ग्राहक तसेच शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी पुढे येत आहे.

नियमांनुसार व्यापारी, किराणा दुकानदार, धान्य व्यापारी, अडते तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांनी वापरणाऱ्या वजन काटे व मापन यंत्रांची नियमानुसार तपासणी करून त्यावर अधिकृत प्रमाणित शिक्का घेणे बंधनकारक असते. मात्र तुळजापूर शहर व तालुक्यातील अनेक आस्थापनांमध्ये अशा तपासण्या प्रत्यक्षात होत आहेत का, याबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेषतः तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये वर्षभर लाखो भाविक दाखल होत असतात. भाविकांकडून पेढे, हळद-कुंकू, प्रसाद साहित्य तसेच विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. यात वर्षभरात 40 ते 50 कोटी रुपयांची उलाढाल होते  या व्यवहारांमध्ये वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक वजन काटे अचूक आहेत की नाहीत, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वजन काट्यांची नियमित तपासणी आणि पडताळणी होत नसल्यास ग्राहकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांच्या बाबतीतही हा विषय अधिक गंभीर मानला जात आहे. धान्य व इतर कृषी माल खरेदी करताना वजनात तफावत राहिल्यास शेतकऱ्यांना थेट आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे शेतमाल खरेदी केंद्रे, अडते व व्यापारी यांच्या वजन काट्यांची नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार तालुक्यातील अनेक व्यापारी आस्थापनांमध्ये इलेक्ट्रॉनिक काटे वापरले जात असले तरी त्यांची प्रमाणित तपासणी झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मापनशास्त्र विभागाने व्यापक मोहीम हाती घेऊन सर्व व्यापारी आस्थापनांची तपासणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि ग्राहक व शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे.


वजन काटे विभागाच्या तपासण्या गुलदस्त्यात?

तुळजापूर शहरासह तालुक्यात मापनशास्त्र विभागाच्या तपासण्यांबाबत विविध स्तरांत चर्चा रंगत आहे. विभागाकडून होणाऱ्या तपासण्या प्रत्यक्षात होतात की केवळ कागदोपत्री मर्यादित राहतात, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. विशेषतः शेतमाल खरेदी-विक्री होणाऱ्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वजन काट्यांची काटेकोर तपासणी होणे आवश्यक असताना त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तुळजापूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे होणाऱ्या व्यापार व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मापनशास्त्र विभागाच्या कामकाजाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे.


 
Top