धाराशिव (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत पत्र सूचना कार्यालय (पीआयबी),मुंबईच्या वतीने धाराशिव येथे मंगळवार, दि.1 सप्टेंबर 2026 रोजी निमंत्रित पत्रकारांसाठी ‌‘वार्तालाप' या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारची धोरणे आणि त्यांच्याशी निगडित विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे,माध्यमांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करणे तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील परस्पर संवाद अधिक दृढ करणे, हा या ‌‘वार्तालाप' कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


शाश्वत शेतीवर होणार संवाद

‌‘आकांक्षित जिल्ह्यांसाठी शाश्वत शेतीचे सुलभीकरण' या विषयावर आयोजित या कार्यशाळेत अणुऊर्जा विभाग,मुंबई आणि केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रतिनिधी सहभागी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.याशिवाय पत्र सूचना कार्यालयातर्फे पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या पत्रकार कल्याण योजनेबाबतही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर तसेच पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. शासनमान्य यादीवरील प्रादेशिक व स्थानिक वृत्तपत्रांचे जिल्हा प्रतिनिधी व संपादक तसेच उपग्रह वाहिन्यांचे जिल्हा प्रतिनिधी यांच्यासाठी हा ‌‘वार्तालाप' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी हर्षल आकुडे,माध्यम आणि संवाद अधिकारी,पत्र सूचना कार्यालय,पुणे (मोबाईल : 9637143544) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top