धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिकच नव्हते, तर समाजप्रबोधन करणारे क्रांतिकारी विचारवंत होते. त्यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून वंचित, श्रमिक आणि सर्वसामान्य जनतेच्या भावना प्रभावीपणे मांडल्या. असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांच्या कार्याला अभिवादन करणारा एक भावपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित सर्वांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी सेलच्या वतीने या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ‘लेखन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
