धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल 1 लाख 85 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या. या मोटारसायकली धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या आदेशानुसार 24 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व पथक धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ कारवाई करून परमेश्वर उर्फ सुरेश चंदर काळे (वय 40, रा. जुना बस डेपो जवळ, पारधी पिडी, धाराशिव) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोटारसायकल चोरीबाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने चोरीच्या मोटारसायकली लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता एकूण चार मोटारसायकली आढळून आल्या. धाराशिव जिल्ह्यातील गुन्हे अभिलेख तपासल्यानंतर यापैकी मोटारसायकली आनंदनगर पोलीस ठाणे, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी परमेश्वर काळे याच्यासह चारही मोटारसायकली ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शोभा बांगर, प्रकाश, चार्ली पोलीस कॉन्स्टेबल दहिहांडे व शेरखाने यांच्या पथकाने केले आहे.
