कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची सेवा देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या गलथान कारभाराचा कळसच गाठला आहे. वीजपुरवठ्यातील कमी-अधिक दाबामुळे पोस्ट ऑफिसमधील संगणक यंत्रणा जळून खाक झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे पैसे जमा-उचल, टपाल व्यवहारांसह विविध शासकीय व ऑनलाइन सेवा घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे.
शासनाने पोस्टाच्या बहुतांश सेवा ऑनलाइन केल्याने संगणक यंत्रणा बंद पडल्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. आठ दिवस उलटूनही तांत्रिक बिघाड दुरुस्त न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, एवढा गंभीर प्रकार घडूनही जिल्हा पोस्ट कार्यालयाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पोस्ट ऑफिसमधील व्यवहार ठप्प असल्याने अनेक नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी पुन्हा-पुन्हा हेलपाटे मारावे लागत आहेत. तर टपाल पाठविण्यासाठी अनेकांना खासगी कुरिअर सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस आणि खासगी कुरिअर सेवेमध्ये काही संगनमत आहे की काय, असा संतप्त सवालही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी नागरिकांनी पोस्ट ऑफिसमध्ये धडक दिली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी विषय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सेवा नेमकी कधी पूर्ववत होणार, याबाबतही ठोस माहिती दिली जात नसल्याने ग्राहकांचा संताप आणखी वाढला आहे.
वरिष्ठांच्या कानावर घातले आहे
याबाबत पोस्टमास्तर विनोद वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, “पोस्ट ऑफिसमधील संगणक यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातले असून ही सेवा लवकरच पूर्ववत सुरू होईल.”
मात्र, आठ दिवसांपासून सेवा ठप्प असताना ‘लवकरच' म्हणजे नेमके कधी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन संगणक यंत्रणा दुरुस्त करून सर्व व्यवहार सुरळीत करावेत, तसेच एवढ्या दिवसांच्या विलंबाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.