धाराशिव (प्रतिनिधी)-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या 6 लाख 36 हजार 36 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर सुमारे 5 हजार 86 कोटी 30 लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम 24 ऑगस्ट 2026 रोजी ऑनलाइन पोर्टलद्वारे थेट जमा करण्यात आली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 21 हजार 793 लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 183 कोटी 85 लाख 89 हजार 956 रुपये जमा करण्यात आले आहेत.

या योजनेसाठी पहिल्या प्रसिद्ध झालेल्या यादीतील उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर शासनाकडून लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी लवकरच शासनाकडून प्रसिद्ध होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 या योजनेस 2 जून 2026 रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर 15 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेच्या काही निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली. योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर खासगी बँका अशा एकूण 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या सुमारे 32 लाख कर्जखात्यांची माहिती महा-आयटीमार्फत विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड केली. 

24 ऑगस्ट रोजी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या राज्यातील सुमारे 6 लाख 36 हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 5 हजार 86 कोटी 30 लाख रुपये जमा करण्यात आले. योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्जाचे वाटप करण्याबाबत सर्व बँकांना शासनामार्फत निर्देश देण्यात आले आहेत. 


 
Top