धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), संवृत्त मंडळ, धाराशिव अंतर्गत नुकत्याच राबविण्यात आलेल्या शिकावू उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नियमांना व गुणवत्तेला तिलांजली देऊन कमी गुण असणाऱ्या उमेदवारांची वर्णी लावण्यात आली असून, जास्त गुण असणाऱ्या होतकरू व पात्र विद्यार्थ्यांना प्रक्रियेतून जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे. याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव शाखेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, तात्काळ योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
महावितरण धाराशिव मंडळांतर्गत वर्ष 2026 साठी वीजतंत्री, तारतंत्री, संगणक चालक किंवा एनसीवीटी उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांची भरती काढण्यात आली होती. यासाठी अप्रेंटिस पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष निवड करताना पारदर्शकता राखण्यात आली नसल्याचे उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांनी महावितरणला प्राधान्य दिल्यामुळे इतर ठिकाणच्या संधी सोडल्या, परंतु महावितरणच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना कोणत्या निकषाद्वारे आणि प्रक्रियेद्वारे बाहेर करण्यात आले, याचे कोणतेही स्पष्टीकरण महावितरण प्रशासनाने दिलेले नाही. जास्त गुण असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना त्वरित न्याय देऊन शिकावू उमेदवार म्हणून सामावून घेण्यात यावे, अन्यथा अभाविपच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अभाविप धाराशिव शहर मंत्री भार्गव मंजुळे यांनी दिला आहे.
