धाराशिव (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत अंतिम लाभार्थी निवडीच्या प्रक्रियेला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ झाला असून, पात्र अर्जदारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि कला सादरीकरणाद्वारे निवड चाचणी सुरू करण्यात आली आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, विविध तालुक्यांतील कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करत आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके तसेच नायब तहसीलदार संतोष पाटील उपस्थित होते.

सन 2023-24 आणि 2024-25 या वर्षांतील लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यासाठी ही चाचणी आयोजित करण्यात आली आहे. योजनेसाठी जिल्हाभरातून एकूण 2 हजार 437 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. प्राथमिक छाननीनंतर 1 हजार 221 अर्जदारांना निवड चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. निवड चाचणीच्या पहिल्या दिवशी वाशी आणि तुळजापूर तालुक्यातील कलावंतांनी सहभाग नोंदविला. 8 जुलै रोजी उमरगा, 9 जुलै रोजी लोहारा, 10 जुलै रोजी कळंब, 13 जुलै रोजी परंडा व धाराशिव, तर 16 आणि 17 जुलै रोजी भूम तालुक्यातील पात्र अर्जदारांची कागदपत्र पडताळणी आणि कला सादरीकरण होणार आहे.

निवड प्रक्रियेसाठी संबंधित कार्यासन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) तसेच गट विकास अधिकाऱ्यांना आवश्यक अभिलेखांसह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पात्र अर्जदारांनी निवड चाचणीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रत, सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती, कलेशी संबंधित प्रमाणपत्रे तसेच ज्या कलेसाठी अर्ज केला आहे त्या कलेच्या सादरीकरणासाठी आवश्यक साहित्य सोबत आणणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


 
Top