धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय दि. 16 मार्च 2024 अन्वये राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजने अंतर्गत पात्र कलावंतांच्या निवडीसाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड समितीसमोर कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद धाराशिव येथे दोन दिवस विविध तालुक्यांतील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी आपले कला सादरीकरण केले.

निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी धाराशिव किर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा  अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मा. श्री तुकाराम भालके तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी समिती सदस्यांना पुस्तक भेट देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मा. किर्तीकिरण पुजार यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या कार्याचा सन्मान होत असून, पात्र कलावंतांना शासनाच्या निकषांनुसार न्याय्य लाभ मिळावा, यासाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविण्यात येत आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा मा. श्रीमती अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित कलावंतांना मार्गदर्शन करताना, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र साहित्यिक व कलावंतांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच जिल्ह्यातील कला व साहित्य क्षेत्रातील योगदानाचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी जिल्हा परिषद कायम सकारात्मक भूमिका घेईल, असेही त्यांनी नमूद केले.

दोन दिवसांत पार पडलेल्या निवड प्रक्रियेमध्ये वाशी तालुक्यातील 70, तुळजापूर तालुक्यातील 66 तसेच उमरगा तालुक्यातील 129 अशा एकूण 265 पात्र कलावंतांनी निवड समितीसमोर आपली कला सादर केली. पुढील टप्प्यात भूम, परांडा, कळंब आणि धाराशिव तालुक्यातील पात्र कलावंतांच्या मुलाखती व कला सादरीकरणाची प्रक्रिया पार पडणार आहे.

सदर निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गठित समितीचे सदस्य दत्तात्रय रणभोर, नागेश मांजरे महाराज, शंकर खामकर, शशिकला गुंजाळ, शिवाजी उगलमुगले, दिलीप सावंत,  श्रीहरी चौरे, सुनील ढगे, श्री दिलीप गरड व श्री दादा सूर्यवंशी यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.

तसेच संबंधित कार्यासन सहाय्यक गटविकास अधिकारी मा. श्रीमती पल्लवी गवळी, ग्रामविकास अधिकारी हृषिकेश कुलकर्णी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हा परिषद धाराशिवचे श्रीमती संगीता दूधभाते, श्री एस. एम. पाळेकर, पी. पी. कुलकर्णी, श्याम गायकवाड, डी. सी. रेड्डी,  एल. एम. गरुड,  एस. जी. शिरसागर, डी. टी. जाधव, के. डी. मुंडे, एस. एम. हुंबे तसेच आनंद चव्हाण यांनी मोलाचे योगदान दिले. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्र कलावंतांची अंतिम निवड करण्यात येणार असून, निवड झालेल्या साहित्यिक व कलावंतांना राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेचा लाभ प्रदान करण्यात येणार आहे.


 
Top