धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा,पर्यटन,आरोग्य, ऊर्जा आणि सार्वजनिक हिताच्या विविध योजनांना गती देण्यासाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली 8 जुलै रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधत प्रत्येक प्रकल्पाची मुदतबद्ध अंमलबजावणी करावी आणि जनतेच्या हिताच्या कोणत्याही कामात विलंब होऊ देऊ नये,असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी दिले.
बैठकीत श्रीक्षेत्र तुळजापूर येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय प्रकल्प,आवश्यक परवानग्या, निधी उपलब्धता तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीशी संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रस्तावित विठ्ठल मूर्ती प्रकल्प, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कामांवरही सखोल चर्चा करण्यात आली. पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील गड-किल्ल्यांच्या संवर्धन व दुरुस्तीच्या कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी,असे निर्देशही सरनाईक यांनी दिले. बैठकीत मराठा समाज मंदिरासाठी जागा निश्चित करणे,तुळजापूर येथे प्राणी संग्रहालय उभारणे, जनावरांसाठी आधुनिक स्मशानभूमी विकसित करणे,धर्मवीर आनंद दिघे थीम पार्कसाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. 15 ऑगस्टपर्यंत नासा (अमेरिका) अभ्यासदौऱ्यासाठी 20 विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तर सार्वजनिक बांधकाम विभाग,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,पुरातत्त्व विभाग, नगरपरिषद,पशुसंवर्धन विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
