भूम (प्रतिनिधी)-  तालुक्यातील पवित्र दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथील परमपूज्य 108 आचार्य श्री वर्धमानसागरजी महाराज यांचे शनिवारी (ता. पाच) सल्लेखनापूर्वक समाधीमरण झाले. त्यांनी 24 जून रोजी यम-सल्लेखनेचा संकल्प स्वीकारला होता. त्यानंतर पूर्ण समत्वभाव, आत्मचिंतन, वैराग्य आणि कठोर तपश्चर्येच्या माध्यमातून अखेरच्या क्षणापर्यंत ही महान आध्यात्मिक साधना पूर्ण केली. त्यांच्या समाधीमरणाची वार्ता समजताच दिगंबर जैन समाजात शोककळा पसरली असून हजारो भाविकांनी कुंथलगिरी येथे धाव घेत अंतिम दर्शन घेतले.

आचार्य वर्धमानसागरजी महाराज यांनी सल्लेखना व्रत स्वीकारून आहार-त्याग, आत्मसाधना आणि वैराग्याचा मार्ग अवलंबला होता. सल्लेखनाकाळात त्यांनी शांतचित्ताने ध्यान, जप आणि आत्मचिंतन करत अध्यात्माचा आदर्श घालून दिला. त्यांच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक कुंथलगिरीत दाखल होत होते. दरम्यान, आचार्य वर्धमानसागरजी महाराज यांचा जन्म 3 जानेवारी 1951 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंत पाटील होते. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून कार्य केले. त्यानंतर सांसारिक जीवनाचा त्याग करून दिगंबर जैन संयममार्ग स्वीकारला. 2004 मध्ये इचलकरंजी येथे आचार्य श्री 108 सन्मतिसागरजी महाराज (दक्षिण) यांच्या सान्निध्यात त्यांनी दिगंबर मुनी दीक्षा घेतली. त्यांना 18 फेब्रुवारी 2011 रोजी आचार्यपदाने गौरविण्यात आले. सिद्धक्षेत्र कुंथलगिरी हे दिगंबर जैन समाजातील प्राचीन आणि पवित्र तपोभूमी म्हणून ओळखले जाते. या पवित्र स्थळी आतापर्यंत 15 हून अधिक जैन मुनी आणि आर्यिकांनी समाधी साधना पूर्ण केली आहे.


 
Top