धाराशिव (प्रतिनिधी)- शेखर गिरी हे मराठी गझल विश्वातील एक संवेदनशील,अभ्यासू आणि सातत्याने लेखन करणारे महत्त्वाचे नाव आहे. ते ज्ञानप्रसार ज्युनिअर कॉलेज, मोहा ता. कळंब येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. समकालीन मराठी गझलक्षेत्रात आशयघनता,भाषेचा सहजपणा आणि जीवनानुभवांच्या अभिव्यक्तीसाठी त्यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. ग्रामीण संवेदना,मानवी नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि अंतर्मनातील सूक्ष्म भावविश्व यांना त्यांनी आपल्या गझलांमधून प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहे. त्यांनी मराठी गझलेचे मंच आपल्या प्रभावी  सादरीकरणाने गाजवले आहेत. सातत्यपूर्ण लेखनामुळे त्यांनी रसिकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

‌‘गझलगिरी', ‌‘मातीत रुजावे म्हणतो' हे गझलसंग्रह, ‌‘खरं तर' हा चारोळीसंग्रह तसेच ‌‘कविता सुमारे एकशे वीस' या ग्रंथाचे संपादन अशी त्यांचीसाहित्यसंपदा आहे. मुर्तिजापूर येथील गझलदीप संस्थेचा 'कै.सुरेश भट राज्यस्तरीय प्रथम गझल पुरस्कार 'प्राप्त झालेला आहे. ‌‘गझलगिरी' हे त्यांचे मराठी गझलविषयक सदर दीर्घकाळ वृत्तपत्रातून प्रकाशित होत राहिले. विविध दिवाळी अंक,नियतकालिके आणि मासिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह अनेक साहित्य संमेलने आणि मुशायऱ्यांमधून त्यांनी आपल्या गझलांचे प्रभावी सादरीकरण केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी ए तृतीय वर्षाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्यांची 'माझा मराठवाडा' ही गझल  नुकतीच समाविष्ट करण्यात आली आहे.

माझा मराठवाडा

कायम तहानलेला माझा मराठवाडा

काळीज फाटलेला माझा मराठवाडा

मुक्ती जरी मिळाली,किंमत किती चुकवली

आगीत पोळलेला माझा मराठवाडा

वणवण किती करावी पाणी कुठे मिळेना

दुष्काळ पेटलेला माझा मराठवाडा

आहेत खूप नेते नावास फक्त आता

कोणी न जाणलेला माझा मराठवाडा

दाऊन स्वप्न नुसते प्रत्येक पाच वर्षी

वेड्यात काढलेला माझा मराठवाडा

केंव्हातरी मलाही मिळणार न्याय नक्की

विश्वास ठेवलेला माझा मराठवाडा

तुटणार ना कधीही होतील खूप राज्ये

राहील जोडलेला माझा मराठवाडा.

प्रस्तुत गझल ‌‘ गझलगिरी' या गझलसंग्रहातून घेतली असून त्यात दुष्काळ, उपेक्षा आणि तुटलेल्या आश्वासनांनी होरपळलेल्या मराठवाड्याची वेदना व्यक्त करतानाच त्याच्या उज्ज्वल भविष्यासंबंधीचा आशावाद व्यक्त केला आहे.सहज,अर्थगर्भ आणि संवेदनशील अभिव्यक्तीमुळे ही गझल वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारी ठरते. त्यांच्या या यशाबद्दल  सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


 
Top