तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील नगरपरिषद कार्यालयाच्या पाठीमागील जवाहर गल्ली परिसरातील सार्वजनिक जागा वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील महिला व पुरुष रहिवाशांनी 6 जुलै रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनाची तातडीने दखल न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
जवाहर गल्लीतील सिटी सर्वे क्रमांक 972 मधील एकूण 2 हजार 364.30 चौरस मीटर जागेपैकी 731 चौरस मीटर जागा भाजी मंडई व इतर सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार 30 नोव्हेंबर 1978 रोजी संबंधित जागेचे कायदेशीररीत्या भूसंपादन करण्यात आले असून, त्याचा मोबदला संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.
भूसंपादनानंतर या जागेवर महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले होते, तर उर्वरित जागा भाजी मंडईसाठी सार्वजनिक वापरात होती. मात्र नगर रचनाकार, धाराशिव यांच्या वारंवार पत्रव्यवहारानंतरही काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणीवपूर्वक लपवून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जागेचे भूसंपादन होऊन पंचांच्या हस्ते ती जागा नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली होती. असे असतानाही संबंधित जागेवर मूळ मालकास बांधकाम परवानगी देण्यात आली आणि त्या ठिकाणी व्यापारी संकुल व लॉजिंग उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित जागेचा कायदेशीर मालक नगरपरिषद असल्याचे कागदपत्र उपलब्ध असल्याचा दावाही नागरिकांनी केला.
नगरपरिषदेतील संबंधित अधिकारी व नगर अभियंता यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता अथवा माहिती असूनही बांधकाम परवानगी दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बांधकाम परवाना रद्द करावा, तसेच सिटी सर्वे क्रमांक 972 पैकी 731 चौरस मीटर जागा नगरपरिषदेच्या ताब्यात घेऊन ती नागरिकांच्या सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
भूसंपादनासंदर्भातील कागदपत्रे आजही उपलब्ध नसल्याचे किंवा ती सापडत नसल्याचे उत्तर संबंधित अधिकारी देत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
उपोषणस्थळी प्रभाग क्रमांक 10 च्या नगरसेविका प्रियंका ताई विजय गंगणे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, या ठिकाणी पूर्वी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह होते; मात्र ते सध्या बंद आहे. या जागेवर सभागृह उभारण्यात यावे, अशी येथील रहिवाशांची इच्छा आहे. याबाबत नगरपरिषद बैठकीत विषय मांडला असून मुख्याधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र काही लोकांच्या भ्रष्टाचारामुळे हे काम रखडल्याचा आरोप त्यांनी केला. या भागातील रहिवासी, मतदार आणि सर्वांच्या सहकार्याने येथे सभागृह उभारून नागरिकांची मागणी पूर्ण करणार असल्याची ग्वाही नगरसेविका गंगणे यांनी दिली. या लाक्षणिक उपोषणात जयकुमार नागनाथ पांढरे, अमरीश भैय्या जाधव, शहाजी काका भांजी, विकास शिंदे यांच्यासह जवाहर गल्लीतील महिला, पुरुष व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील अनेक मान्यवर व प्रतिष्ठित नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
