धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 1 कोटी 52 लाख 48 हजार 418 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मुक्काम, बैठका तसेच विविध मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
या प्रकल्पासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर शासनाने प्रस्तावास मंजुरी देत प्रशासकीय मान्यता जाहीर केली. शासन निर्णयानुसार या प्रकल्पासाठी एकूण खर्चापैकी 76.24 लाख रुपयांचे म्हणजेच 50 टक्के अनुदान शासनाकडून दोन टप्प्यांत दिले जाणार आहे. उर्वरित निधी बाजार समितीने स्वनिधी अथवा कर्जाच्या माध्यमातून उभारायचा आहे. मंजूर अंदाजपत्रकात इमारत बांधकाम, गुणवत्ता नियंत्रण, जीएसटी, वीज व्यवस्था, मजूर विमा आदी खर्चांचा समावेश करण्यात आला आहे.
शासनाने या कामासाठी काही अटीही घातल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता घेतल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, प्रशासकीय मान्यतेच्या दिनांकापासून एका वर्षाच्या आत शेतकरी भवनाचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामाच्या प्रगतीचा अहवाल नियमितपणे संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. तसेच भवनाची देखभाल, दुरुस्ती, वीज-पाणी व इतर दैनंदिन खर्चाची जबाबदारी बाजार समितीवरच राहणार आहे. या निर्णयामुळे कळंब बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षित निवास, बैठक व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, कृषी बाजार व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
