धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विस्तार अधिकारी (शिक्षण) पदोन्नती प्रक्रिया शासनाच्या नियमावली व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून राबविण्यात आल्याचा आरोप करत धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज मंत्री  यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी तुळजापुरचे आमदार तथा मित्राचे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते.

निवेदनात, 03 जुलै 2026 रोजी करण्यात आलेली विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया रद्द करून शासनाच्या नियमांनुसार नव्याने पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली. तसेच 2014 च्या शासन मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणे, 2024 मधील शासन निर्देशांकडे दुर्लक्ष करणे, सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय,  उत्तीर्ण-अनुत्तीर्ण शिक्षकांमध्ये भेदभाव, तसेच शिक्षण संचालकांच्या पत्राचा चुकीचा अर्थ लावून पदोन्नती करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. याशिवाय, 03 जुलै 2026 रोजीची सर्व पदोन्नती प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि सेवाज्येष्ठतेनुसार नव्याने पदोन्नती प्रक्रिया राबवावी, अशा प्रमुख मागण्या समन्वय समितीने केल्या. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिक्षक संघटनांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. “पदोन्नती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचे चौकशीत आढळल्यास संबंधित पदोन्नती रद्द करण्यात येतील आणि शासनाच्या नियमांनुसार योग्य निर्णय घेतला जाईल,“ असे स्पष्ट आश्वासन त्यांनी शिक्षक प्रतिनिधींना दिले.

या प्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवेदनावर बाळकृष्ण तांबारे, बिभिषण पाटील बशीर तांबोळी ,विलास कंटेकुरे ,पवन सूर्यवंशी, लालासाहेब मगर संतोष देशपांडे ,खमरोद्दीन सय्यद अभय यादव बळवंत घोगरे, बाळासाहेब घेवारे ,विशाल अंधारे ,विकास चव्हाण, रमेश बारस्कर ,किशोर पिसे, शेख खुदबुद्दीन, चंदन लांडगे, गायकवाड एटीएम राजेंद्र बिक्कड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top