धाराशिव(प्रतिनिधी)- प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब, वाचनालय, अभ्यासिका, विद्युत शवदाहिनी, प्रत्येक घरावर सौरऊर्जा प्रकल्प, आशा व पर्यवेक्षिकांना स्कूटर, हजारो महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्यासारखे अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद असल्याचे गौरवोद्गार ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले. जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची, ग्वाहीही मंत्री गोरे यांनी दिली.
यावेळी आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर,
जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष उषाताई गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नगराध्यक्षा नेहा काकडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे, मराठवाडा संयोजक नितीन काळे, जिल्हा परिषदचे विषय समितीचे सर्व सभापती, जिल्हा परिषदेचेच्या सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित 'आपला जीव धाराशिव व्हिजन 2030' कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित महाराष्ट्राचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून, त्याला पूरक ठरेल असे विकसित धाराशिवचे स्वप्न जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी मांडल्याचे सांगत गोरे यांनी अर्चनाताई पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारचे दूरदृष्टीचे नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, याची आठवण करून देत धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धाराशिवमधून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचा नवा आदर्श निर्माण होत असल्याचे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी धाराशिवमध्ये 110 गणात विद्युत शवदाहिनी उभारण्यात येणार आहे. त्याप्रमाणे 700 गावामध्ये दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत टीव्ही आणि मोबाईल बंद हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे असे सांगितले. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम 2027 पर्यत पूर्ण होवून या मार्गावर रेल्वे धावण्यास सुरूवात होईल. तर दुसरा टप्पा तुळजापूर-सोलापूर असून, हे काम डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले.
