भूम (प्रतिनिधी)-  नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन तब्बल 18 दिवस उलटले असतानाही इयत्ता सहावीच्या सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या हाती नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके पोहोचलेली नसल्याने शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. यंदापासून सहावीच्या सेमी इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम बदलून सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात आला आहे. मात्र या बदलानुसार आवश्यक असलेली पाठ्यपुस्तके अद्याप विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली नाहीत. पुस्तके छापण्यात झालेला विलंब, वितरण व्यवस्थेतील अडचणी किंवा अन्य कोणतेही कारण असो; परंतु शाळा सुरू होऊन मोठा अवधी उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पुस्तकांविनाच शिक्षण घ्यावे लागत आहे, हे तितकेच वास्तव आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने शाळांना सेतू पुस्तिका उपलब्ध करून दिल्या असून सध्या शिक्षक त्याच पुस्तिकांच्या आधारे अध्यापन करत आहेत. मात्र सेतू पुस्तिका हा केवळ तात्पुरता पर्याय असून नियमित अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या पाठ्यपुस्तकांची जागा त्या घेऊ शकत नाहीत. त्यामुळे “विद्यार्थ्यांच्या हाती नवीन पुस्तके नेमकी कधी पोहोचणार?“ हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पाठ्यपुस्तके नसल्यामुळे शिक्षकांना नियोजित अभ्यासक्रमानुसार अध्यापन करताना अडचणी येत असून विद्यार्थ्यांनाही फळ्यावर लिहिलेल्या नोंदी व सेतू पुस्तिकांवरच अवलंबून राहावे लागत आहे. अभ्यासक्रम बदलाचा निर्णय वेळेत झाला असताना त्यानुसारची पुस्तकेही शाळा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध होणे अपेक्षित होते, अशी भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे. 

शैक्षणिक वर्षाचा महत्त्वाचा कालावधी उलटत असतानाही विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके नसणे ही गंभीर बाब मानली जात असून शिक्षण विभागाने नवीन सीबीएसई पॅटर्नची सर्व पाठ्यपुस्तके तातडीने वितरित करून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून होत आहे.

 
Top