उमरगा (प्रतिनिधी)- संकटकाळात आपण कधीही डगमगलो नाही. आपली माणसं मोठी केल्याशिवाय आपण मोठे होत नाही. आजपर्यंत वंचित घटकाला न्याय दिला. यापुढेही सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विचारांची बैठक असलेला हा उमरगा तालुका आहे. राजकारणाच्या पलीकडच्या गोष्टी या तालुक्यात घडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासाला उंचीवर घेऊन जात आहेत. विश्वगुरु म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व उद्याला आले आहे. अखंडपणे सेवेचा वसा उचललो आहे. राजकारणात चांगली माणसं येण, चांगली माणसं घडवणं, चांगल्या माणसांच्या पाठीमागे राहुन आपल्या भागाचा विकास साधणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार, जात धर्मापलीकडे जाऊन मैत्री जपताना विरोधकांनाही जवळ केले. कोणत्याही क्षेत्रात काम करताना विश्वास संपादन करणे खुप कठिण काम असल्याचे आमदार बसवराज पाटील यांनी दिले.
धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधानपरिषदेवर विक्रमी मताने विजयी झाल्याबद्दल श्रमजीवी परिवार व उमरगा जनता बँकेच्या वतीने श्री गणरायाची मुर्ती देऊन माजी मंत्री तथा भाजपाचे लातुरचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, आमदार अभिमन्यु पवार, कर्नाटकचे आमदार मारुती मुळे, माजी आमदार बब्रुवान खंदारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, सुनिल चव्हाण, भागवत धस, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, मधुकर मोटे, श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर आदीसह लातुर व धाराशिव जिल्ह्यातील विविध संस्थां व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
