धाराशिव (प्रतिनिधी)- थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -2026 च्या माध्यमातून घेतला आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.दि.धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.धाराशिव यांच्यामार्फत जिल्ह्यातील 7329 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती अपलोड करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक श्री. पांडुरंग साठे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सहकार विभागाच्या पोर्टलवर पात्र कर्जदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात येत आहे.2 जुलैपर्यंत भूम तालुका - 383 शेतकरी (रक्कम 1 कोटी 71 लक्ष 82 हजार रुपये),धाराशिव तालुका- 2717 शेतकरी (रक्कम 23 कोटी 86 लक्ष 12 हजार रुपये),कळंब तालुका - 1379 शेतकरी (रक्कम 8 कोटी 79 लक्ष 84 हजार रुपये), लोहारा तालुका -196 शेतकरी (रक्कम 1 कोटी 25 लक्ष 27 हजार रुपये),परंडा तालुका 981 शेतकरी (रक्कम 5 कोटी 87 लक्ष 9 हजार रुपये), तुळजापूर तालुका - 869 शेतकरी (रक्कम 5 कोटी 87 लक्ष 9 हजार रुपये),उमरगा तालुका - 601 शेतकरी (रक्कम 4 कोटी 2 लक्ष 9 हजार रुपये आणि वाशी तालुका- 503 शेतकरी (रक्कम 2 कोटी 2 लक्ष 50 हजार रुपये) अशा एकूण 7 हजार 629 कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहे.या पात्र शेतकऱ्यांची रक्कम 53 कोटी 16 लक्ष 8हजार रुपये आहे.