बीरभूम येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी निलेश गायकवाड रुजू
उमरगा,दि.12 : उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील रहिवासी तथा कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी निलेश श्रीकांत गायकवाड यांची अप्पर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) पदावर पदोन्नती होऊन पश्चिम बंगाल राज्यातील बीरभूम जिल्ह्यात नियुक्ती झाली आहे. त्यांच्या याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
निलेश गायकवाड हे यापूर्वी पश्चिम मेदिनीपुर जिल्ह्यातील घाटाल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या सेवाकाळात त्यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती, प्रभावी नेतृत्व आणि जनहिताभिमुख कामकाजाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती पश्चिम बंगालमधील महत्त्वाच्या व संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बीरभूम जिल्ह्यात करण्यात आली असून ते नुकतेच आपल्या नव्या पदावर रुजू झाले आहेत.बीरभूम जिल्ह्यात बोलपूर, रामपूरहाट आणि सूरी या तीन उपविभागांचा समावेश असून जिल्ह्यात 28 पोलीस ठाणे कार्यरत आहेत. याशिवाय वाहतूक शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, सायबर गुन्हे शाखा, गुप्तवार्ता विभाग तसेच विशेष तपास पथके स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून निलेश गायकवाड यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा समन्वय साधणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे नियंत्रण, प्रशासकीय देखरेख तसेच विविध विशेष मोहिमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सहाय्य करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे.
त्यांच्या पदोन्नती व नव्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील यशस्वी सेवाकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.