तुळजापूर घडणार अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाचे हब
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता शासकीय
अध्यापक आणि शिक्षकेतर ११८ नवीन पदांना मान्यता ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही महानगरांतील विद्यार्थ्यांप्रमाणे अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, नवतंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. या क्षेत्रातील भविष्यातील संधी पाहता त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी आम्ही दृढनिश्चयी असून या दिशेने सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने अनेक वर्षांपासून त्याची मागणी होती.त्याअनुषंगाने आई तुळजाभवानी मातेच्या नावाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करावे यासाठी आपला आग्रह होता व त्या अनुषंगाने आपण याबाबत मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे, उदय सामंत व विद्यमान मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो.आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले आहे.त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह तत्कालीन तसेच विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांचे आभार मानले असून राज्य शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने महाविद्यालयासाठी ३०० प्रवेशक्षमतेनुसार ६० नियमित अध्यापक पदे आणि ५८ शिक्षकेतर पदांसह एकूण ११८ पदांना मान्यता दिली आहे. भविष्यात रिक्त पदे शासकीय नियमानुसार भरली जाणार आहेत. तसेच महाविद्यालयाचे नाव बदलून ‘श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर’ असे करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे तुळजापूर व धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण, आधुनिक सुविधा आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा लाभ मिळणार असून हा निर्णय जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले.
जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी ऐतिहासिक निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय म्हणजे तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शासकीय महाविद्यालयात रूपांतर होय. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणारे तांत्रिक शिक्षण उपलब्ध होणार आहे. तसेच ११८ अध्यापक व शिक्षकेतर पदांना मान्यता मिळाल्याने संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट होईल.सध्या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना नवीन पदभरतीमध्ये सहभागी होता येणार असून जे होणार नाहीत त्यांना संस्थानच्या माध्यमातून वेतन देण्यात येणार आहे.‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दृष्टीकोनातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी, ग्रीन टेक्नॉलॉजी, रिन्यूएबल एनर्जी आणि ईव्ही टेक्नॉलॉजी यांसारखे आधुनिक, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक असून, जिल्ह्याला उच्च शिक्षणाच्या नव्या युगात घेऊन जाण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.