तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे रविवारी दुपारी अवघ्या 20 मिनिटांच्या मुसळधार पावसाने मंदिर परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा आणि दर्शन व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या. बिडकर पायऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात घाण पाणी आल्याने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना त्याच पाण्यातून मार्ग काढत दर्शन मंडपाकडे जावे लागले. त्यामुळे भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

सध्या वाढत्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुखदर्शन आणि सशुल्क दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बिडकर पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपात प्रवेश दिला जात आहे. मात्र रविवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू होताच वेताळनगर भागातील डोंगरावरून नाल्याद्वारे आलेल्या पाण्याचा मोठा लोंढा काळभैरव मंदिर परिसरातून थेट बिडकर पायऱ्यांपर्यंत पोहोचला. याचवेळी श्री तुळजाभवानी मंदिरालगतच्या वगळ भागातून वाहत आलेले घाण पाणी पवेकर यांच्या घरासमोरील रस्त्यावरून दर्शन मंडपाच्या दिशेने आले. या दोन्ही बाजूंचे पाणी एकत्र झाल्याने संपूर्ण मार्ग जलमय झाला. या पाण्यात प्लास्टिक कचरा, गाळ आणि इतर घाण वाहून येत असल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, या पायऱ्यावरून वाहणाऱ्या घाण पाण्यातुन अनेक भाविकांना पाण्यातूनच चालत मंदिरात प्रवेश करावा लागला. यामुळे मंदिर प्रशासनाच्या पावसाळी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अस्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असतानाच अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर पुढील काही महिन्यांत मुसळधार पावसात भाविकांची किती मोठी गैरसोय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे बिडकर पायऱ्या परिसरात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी स्वतंत्र गटार व्यवस्था, नाल्यांची नियमित स्वच्छता आणि घाण पाणी दर्शन मार्गावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी भाविकांनी केली आहे. 

 
Top