धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या 'संघटन सृजन अभियान' अंतर्गत राज्यभर पक्षसंघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या उद्देशाने तालुका व शहर स्तरावरील संघटनात्मक बांधणी सुरू असून तालुका व शहर निहाय संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने, त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश निरीक्षकांनी जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून केलेल्या शिफारशींनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या.  यानुसार धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी धनंजय रामभाऊ राऊत, धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विनोद जीवनराव वीर, वाशी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अमर मुरलीधर तागडे, भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड. सिराज हुसेन मोगल, लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी दयानंद सुग्रीव पाटील, तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड. अरविंद बेडगे तसेच लोहारा शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी रौफ बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास, नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्यास तसेच गावपातळीपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्यास मोठी चालना मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पक्षसंघटना अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

 
Top