भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील साडेसांगवी गावातील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीवरील अतिक्रमण हटवून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय, भूम येथे हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, साडेसांगवी ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी विहीर गेल्या 30 वर्षांपासून नदीपात्रात असून त्या विहिरीतून गावाला नियमित पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, विहिरीच्या उत्तर बाजूस काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून दुसरी वैयक्तिक विहीर नोंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीने 20 एप्रिल 2026 पासून पाणीपुरवठा बंद केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईन मंजूर झाली असून काम पूर्ण झाले आहे. मात्र संबंधित शेतकऱ्यांनी पाईपलाईन अडविल्यामुळे योजना सुरू होऊ शकलेली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास 7 मे 2026 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर उपोषणकर्ते म्हणून ॲड. किशोर भागवत डोंबाळे, विठ्ठल अंकुश माने व आकाश साहेब रामचंद्र देवकते यांची नावे आहेत.

 
Top