धाराशिव (प्रतिनिधी) -  येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिवच्या वतीने आयोजित सामुदायीक उपनयन संस्कार सोहळा उत्साहात पार पडला. सोहळ्यामध्ये वेदघोष, मंत्रोच्चारात 22 बटूवर उपनयन संस्कार करण्यात आले.

धाराशिव येथे ब्राह्मण कल्याण ट्रस्ट ही सामाजिक संघटना मागील 8 वर्षापासून सामुदायीक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करत आहे. या वर्षी शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10.42 वाजता शहरातील मान्यवर पुरोहित वर्गाच्या वेदघोष, मंत्रोच्चारात धाराशिव जिल्ह्यासह परिसरातील 22 बटूवर उपनयन संस्कार करण्यात आले. बटूंना यज्ञोपवीत धारण करून गायत्री मंत्राचे महत्त्व सांगण्यात आले. पालकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत मुलांच्या आयुष्यातील या महत्त्वपूर्ण संस्काराचा आनंद साजरा केला. ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून या सामुदायीक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

बटूंना आर्शिवाद देण्यासाठी शहर व परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धाराशिव शहरातील वेदशास्त्र संपन्न असलेल्या 20 पुरोहितांनी 22 बटूंवर सर्व विधीवत संस्कार केले, तसेच धाराशिव शहरातील वेदपाठ शाळेमधील विद्यार्थी व सर्व पुरोहितांनी बटूंना चारी वेदांच्या मंत्रांचे आशीर्वाद दिले. हा उपनयन संस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिवच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी समाजात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी अशा सामुदायिक उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

 
Top