धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांना झगडून न्याय मिळावा लागतो. काहीजण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या घरातच जिल्हा परिषद अध्यक्षपद दिले असे आरोप केले. मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना रात्री 12 वाजेपर्यंत कामे केली. आता जिल्हा परिषद अध्यक्षपद मला मिळाले. हे अध्यक्षपद मी घेण्यास कशी पात्र आहे, हे मला सिध्द करावे लागते. अशी खंत धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.
बुधवार दि. 1 एप्रिल रोजी जि. प. च्या सभागृहात दुपारी पत्रकार परिषदेत घेण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके, शिक्षणाधिकारी खंदारे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वाघद
आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी जिल्हा परिषदच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष व महिला व बालकल्याण सभापती महिला असल्यामुळे महिला राज बऱ्याच वर्षानंतर आले आहे. त्यामुळे महिलांसाठी काही विशेष योजना राबवणार का ? या संदर्भात विचारले असता त्यांनी जननी आरोग्य योजना, प्रभावीपणे राबवणार असल्याचे सांगून, आशा कार्यकर्त्यांना वाहन उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी अंगणवाडी शालेय पोषण आहार वाटप, सेमी इंग्रजी, संत साहित्य यावर आधारित चल प्रदर्शन, समृध्द ग्रामपंचायत, मुला-मुलींची शाळा एकत्रीकरण आदी योजनेची माहिती दिली.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन, दुहेरी पंप योजना कामासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना कार्यकारी अभियंता कटकधोंड यांना पुरेशी माहिती देता आली नाही.
पदाधिकाऱ्यांसाठी नवीन निवासस्थान
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे सर्व निवासस्थाने जिल्हा परिषदच्या आवारात होतील. त्याप्रमाणे धाराशिव पंचायत समिती इमारत, उमेद इमारत आदी इमारतींची कामे लवकरच सुरू होतील. जिल्हा परिषदेच्या जागेवर ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत ते अतिक्रमण काढण्यात येवून, जिल्हा परिषदच्या नावे 8 अ मालकी हक्क प्रमाणपत्र तयार करण्यात येईल. असेही अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.
