धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार असून,डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त 30 एप्रिलपर्यंत विविध पक्ष,संघटना व मंडळांकडून मिरवणुका,रॅली व शोभायात्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
या मिरवणुका व रॅलीदरम्यान आयोजकांकडून प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र या प्रखर प्रकाशामुळे मिरवणुकीत सहभागी होणारे तसेच ती पाहण्यासाठी उपस्थित असलेले लहान मुले, वयोवृद्ध,ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिक यांच्या डोळ्यांना इजा होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.याचबरोबर,अशा तीव्र प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असून, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर,दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवांच्या अनुषंगाने प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर टाळावा,यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात निर्बंध आदेश लागू करण्यात आले आहे.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163(1) नुसार,नागरिकांच्या जीवितास किंवा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तरतूद आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत पार पडावा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.नागरिकांच्या डोळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मिरवणुका,रॅली व शोभायात्रांमध्ये प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर कटाक्षाने टाळणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.