तुळजापूर (प्रतिनिधी)- माळुंब्रा ते मसला असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 ला जोडणारा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला असून प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सुमारे 5 किलोमीटरचा हा मार्ग अक्षरशः चाळण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळुंब्रा हायवेपासून पुढे मसला, काठी, दहिवडी, ढेकरी, अपशिंगा, सारोळा, कासारी (ता. बार्शी) या गावांना जोडणारा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि ग्रामस्थ या मार्गाचा वापर करत असतात.
गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी डांबर पूर्णपणे निघून गेला आहे. त्यामुळे वाहन चालवताना अपघाताचा धोका वाढला आहे.
वाहतूक आणि शेतीवर परिणाम
हा रस्ता शेतमाल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत माळुंब्रा-मसला रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, खड्डे बुजवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी. संबंधित विभागाने स्थळ पाहणी करून कामाला गती द्यावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. महत्त्वाचा संपर्क रस्ता असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.अपघात टाळण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
