धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत यंदा जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता 6वीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण 80 जागांपैकी तब्बल 66 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील निवड झालेले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातून 80 पैकी 77 विद्यार्थ्यांची निवड झाली असून, हे ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तेचे द्योतक मानले जात आहे.

तालुकानिहाय एकूण निकाल पुढीलप्रमाणे आहे  धाराशिव (20), तुळजापूर (18), कळंब (13), उमरगा (07), भूम (07), लोहारा (07), वाशी (04) आणि परंडा (04) असे एकूण 80 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा वाटा लक्षणीय आहे. तालुकानिहाय जिल्हा परिषद शाळांमधील निवड पुढीलप्रमाणे  धाराशिव तालुका 20 पैकी 18, तुळजापूर 18 पैकी 16, कळंब 13 पैकी 12, उमरगा 7 पैकी 4, भूम 7 पैकी 4, लोहारा 7 पैकी 5, वाशी 4 पैकी 2 तसेच परंडा 4 पैकी 4 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून निवड झालेले आहेत. मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधून 63 विद्यार्थ्यांची निवड झाली होती, तर यंदा हा आकडा वाढून 66 वर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्ष उषाताई गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी कैलास पिकवणे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.

 
Top