धाराशिव (प्रतिनिधी)-  सत्ता महत्त्वाची आहे, पण त्यामुळे पक्षात फूट पडू देणार नाही असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं. तसचे धाराशिवमध्ये शिवसेनेतील एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, असे पालकमंत्री प्रताप सरनाईकांची यांनी सांगितले आहे.

पुरोगामी विचाराचे लोकराज्यच्या बातमी नंतर पालकमंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर धाराशिव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेबाबत विविध चर्चांना उधाण आले असताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका मांडत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सरनाईकांनी मांडली.


अफवांवर कठोर भूमिका

नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. पुढील सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच काही मंडळींकडून दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून काहीजणांकडून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही, असं सरनाईकांनी सांगितलं. 


मतभेदांचा आभास

आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही प्रताप सरनाईकांनी नमूद केले. मात्र आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


पुढील रणनीतीवर चर्चा

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती ठरवली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितलं. तथाकथित स्वयंभू नेत्यांनी पक्षाच्या रणनीतीबाबत भाष्य करू नये, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.


तत्त्वांशी तडजोड नाही

सत्ता हे ध्येय असले तरी तत्त्वांशी तडजोड नाही. दबाव, आमिष किंवा अफवांच्या आधारे शिवसेनेची एकजूट ढळणार नाही, असा ठाम विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करून पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल त्यामागे ठामपणे उभे राहावे, तसेच संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. आगामी राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना अधिक सक्षमपणे उभी राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


 
Top