धाराशिव (प्रतिनिधी)-  शालेय पोषण आहारामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी व पुरवठादार यांच्यावर कारवाई करावी शिवाय याची एसआयटी मार्फत चौकशी करावी. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत शिक्षण मंत्र्यांकडे केली. यावर शिक्षण मंत्री यांनी सचिव पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. 

यावेळी आमदार पाटील म्हणाले की, पंतप्रधान शालेय पोषण आहार योजना ही राज्यामध्ये राबवली जात आहे. मात्र हिरवा वाटण्या ऐवजी पांढरा वाटाणा वितरित करून यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जवळपास दोन्ही वाटाण्यामध्ये शंभर रुपयाचा किलोमागे फरक येत आहे. त्यामुळे याच्या गैरव्यवहाराची रक्कम मोठी आहे. अत्यंत शांत डोक्याने अधिकारी व पुरवठादार यांच्या संगनमताने हा व्यवहार झाल्याचे आमदार कैलास पाटील यांनी आपल्या लक्षवेधी मध्ये सांगितले. निविदेमध्ये हिरवा वाटाणा व कार्यारंभ आदेश देताना फक्त वाटाणा असा उल्लेख केला आहे. मात्र वितरित करताना पांढरा वाटाणा देण्यात आला. हिरवा वाटाणा याची किंमत पांढरा वाटण्याला लावून हा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. 

यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी असा प्रकार झाला असल्याचे मान्य केले व त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करू असे मोघम उत्तर दिले. त्यावर आमदार कैलास पाटील आक्रमक होऊन मी स्वतः याची तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीच्या संदर्भात आत्तापर्यंत काय कार्यवाही केली याची विचारणा केली. पुरवठादार हे सरकारचे जावई आहेत का त्यांना पाठीशी घालण्याचे कारण काय अशी प्रश्नांची सरबत्ती केल्याने काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण तयार झाले. हे पाहताच दादा भुसे यांनी नरमाईची भूमिका घेत पहिल्यांदा आयुक्तांमार्फत व नंतर सचिवांमार्फत चौकशी करण्याची ग्वाही दिली. आमदार कैलास पाटील यांनी या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरत चौकशी करण्यास भाग पाडले. 

 
Top