मुरुम (प्रतिनिधी)- निवडणुकीच्या काळात दिलेले आश्वासन पूर्ण करत, विधानसभा समितीचे सह-अध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते उमरगा तालुक्यातील सावळसूर येथे शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून शेत पाणंद रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सावळसूर येथील पाणंद रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शरण पाटील यांनी ग्रामस्थांना दिले होते. आज या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ झाल्याने सावळसूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

याप्रसंगी बोलताना शरण पाटील म्हणाले की, “शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून उमरगा आणि लोहारा तालुक्यात आम्ही पाणंद रस्त्यांचे जाळे विणले असून, हे काम भविष्यातही अविरत सुरू राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्यांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊन हा रस्ता सर्वांगीण सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उमरगा-लोहारा तालुक्यात राबविलेल्या या बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा एक आदर्श पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेट करू,“ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सावळसूर ते चिरेवाडी आणि आकाश इंगळे यांच्या शेतापासून ते दगडू येमगर यांच्या शेतापर्यंतचा हा सुमारे 2 किलोमीटर लांबीचा रस्ता केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही, तर सावळसूर, चिरेवाडी आणि आजूबाजूच्या अनेक गावांसाठी दळणवळणाची महत्त्वाची वाहिनी ठरणार आहे. या रस्त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार असून शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, तंटामुक्त अध्यक्ष श्याम चिंचोळे, योगेश राठोड, माजी सभापती सचिन पाटील, आकाश इंगळे, प्रेमनाथ सूर्यवंशी, कमलाकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाबुराव सूर्यवंशी, भास्कर बोधे, शाहूराज सूर्यवंशी यांच्यासह सावळसूर व परिसरातील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top