कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील खोंदला येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात दि . 26 ते 2 एप्रिल रोजी सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि धार्मिक उत्साहात सप्ताहाचा प्रारंभ झाला असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

समस्त गावकरी मंडळ, खोंदला यांच्या वतीने आयोजित या सप्ताहाच्या प्रारंभी कलश पूजन, ध्वज पूजन, टाळ, मृदुंग, वीणा आणि गाथा पूजन यांसह विविध धार्मिक विधी पार पडले. पहिल्याच दिवशी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला. सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, काकडा आरती, तर सायंकाळी कीर्तन, प्रवचन आणि हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध नामवंत कीर्तनकारांच्या माध्यमातून संत साहित्य, भागवत धर्म आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला जात आहे.

या सप्ताहात ह.भ.प. बळीराम महाराज कवडे , ह.भ.प. प्रदीप महाराज यादव, ह.भ.प. श्री. संभाजी महाराज में हुणकर, ह.भ.प. गणेश महाराज जोगदंड, ह.भ.प. महंत श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प. श्री. गोविंद महाराज पांगरकर , ह .भ .प दिपक महाराज मेटे आदी मान्यवर कीर्तनसेवा देणार आहेत. सप्ताहाचा समारोप गुरुवारी दि . 2 रोजी महाप्रसादाने होणार असून ह.भ.प. श्री. महंत भगवान महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन विशेष आकर्षण ठरणार आहे. गावातील महिला मंडळ, युवक मंडळ आणि ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.


 
Top