धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात दुपारी कथाकथन सत्र पार पडले. कधी खुमासदार विनोदी शैलीत तर कधी समाजजीवनाचे विदारक चित्रण करणाऱ्या कथाकथनाने साहित्यप्रेमींना खिळवून ठेवले.

डॉ. सत्यशिला तौर (जालना) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन सत्रात प्रा.सुरेश पाटील (अंबाजोगाई) व स्वाती कान्हेगावकर (नांदेड) यांचा सहभाग होता. मंचावर स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती. डॉ. सत्यशीला तौर यांनी वलांडा ही कथा सादर केली. समाजातल्या प्रथेमुळे कथेची नायिका सासुरवास आणि अंधश्रद्धेची बळी ठरते. पण शिकलेल्या गावातली मुलगी तिला भोंदू बाबाच्या फोलपणा बद्दल सांगते. तेव्हा तिला तिची चूक कळते. आणि अंधश्रद्धेचा विचार ओलांडून ध्रुपदा नवीन विचार स्वीकारते. अशी कथा सांगून समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार केला.

प्रा. सुरेश पाटील यांनी, निरोप या कथेत गुरु-शिष्य यांचे नाते सांगणारी कथा, मित्रप्रेम आणि शिक्षणाचा संघर्ष मांडला. प्रा. स्वाती कान्हेगावकर यांनी शेवग्याच्या शेंगा या कथेतून ग्रामीण स्त्रीच्या कष्टाची, जिद्दीची आणि मुलांसाठी जीवाचे रान करणाऱ्या आईचे चित्रण मांडले. ही आई परिस्थिती पुढे झुकत नाही. मुलाला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करूनही नियती मुलाला हिरवते. पण शेवग्याच्या झाडात आपल्या मुलाला पाहत झाडाचे संगोपन करते. असा कथेचा आश्य होता. कथाकथन सत्राचे सुत्रसंचालन अविनाश ताटे यांनी केले. तर आभारप्रदर्शन बालाजी तांबे यांनी केले.

 
Top