तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्री पौर्णिमा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदाची चैत्र पौर्णिमा बुधवार दि. 1 एप्रिल पासून सुरू होऊन गुरुवार दि. 2 एप्रिल रोजी समाप्त होणार असून, या पार्श्वभूमीवर संपूर्ण तुळजापूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पौर्णिमेची सुरुवात बुधवार सकाळी 07.06 वाजता होणार असून गुरुवारी सकाळी 07.41 वाजता तिची समाप्ती होणार आहे. यात्रेच्या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, पहाटे 1 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. जवळपास 22 तास मंदिर भाविकांसाठी खुले राहणार असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनाचा लाभ घेणार आहेत. गर्दीचे नियोजन लक्षात घेऊन भाविकांना बिडकर तलाव पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन व मंदिर संस्थानतर्फे सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
‘पळती यात्रा’ची परंपरा जिवंत
चैत्री पौर्णिमा यात्रा ‘पळती यात्रा’ म्हणून ओळखली जाते. शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी ही यात्रा विशेष महत्त्वाची मानली जाते. सुगी हंगाम संपल्यानंतर शेतकरी काहीसा मोकळा होत असल्याने तो या कालावधीत धार्मिक यात्रांचा आनंद घेतो. या यात्रेची सुरुवात चैत्री एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाने होते. त्यानंतर भाविक शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेतात आणि पुढे चैत्री पौर्णिमेला तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दाखल होतात. या धार्मिक प्रवासाची सांगता येरमाळा येथील येडाई देवीच्या दर्शनाने होते. या सर्व यात्रा एकामागोमाग एक होत असल्याने भाविकांना अक्षरशः धावपळ करावी लागते, म्हणूनच या यात्रेला ‘पळती यात्रा’ असे संबोधले जाते. या यात्रेत विशेषतः मराठवाड्यातील भाविकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. रोजगारासाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत स्थायिक झालेले भाविकही या निमित्ताने गावाकडे परत येतात.
प्रशासन सज्ज, भाविकांची उत्सुकता शिगेला
तुळजापूर शहरात स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण आणि आरोग्य सुविधा यांसाठी प्रशासन सज्ज झाले असून, यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. भाविकांमध्येही यात्रेबाबत प्रचंड उत्सुकता असून, तुळजापूर पुन्हा एकदा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने दुमदुमणार आहे.
चैत्र पौर्णिमा काळात बिडकर तलाव पायऱ्या मार्गे देवि दर्शणार्थ मंदिरात भाविकांना सोडणार!
श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा महोत्सव 2026 हा दिनांक 30 मार्च 2026 ते 03 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या महोत्सव काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेता, तसेच सलग सुट्ट्यांचा विचार करून मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याअनुसार, दिनांक 31 मार्च 2026 रोजी रात्री 01:00 वाजल्यापासून ते 05 एप्रिल 2026 रोजी रात्रीपर्यंत भाविकांना ‘बिडकर पायऱ्या’ येथून दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी देवीला वेदांत कुलकर्णी यांनी केली सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण श्री तुळजाभवानी मंदिर येथे आज सकाळी पाथरी, जिल्हा परभणी येथील श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी देवीच्या चरणी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण केली. या प्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
भाविकांची हरवलेली पर्स सुरक्षारक्षकांनी प्रामाणिकपणे केल परत
श्री तुळजाभवानी मंदिर येथे शनिवार, दि. 28 मार्च रोजी सकाळी .
भाविक मंगल शशिकांत कबाडे (रा. जुन्नर पाडळी) हे देवीचे दर्शन घेण्यासाठी आले असता गर्दीमध्ये त्यांची पर्स हरवली. संबंधित पर्स सिंहांचा गाभारा परिसरात कार्यरत सुरक्षारक्षक सौ. सविता चव्हाण यांना आढळली. सौ. चव्हाण यांनी तत्परता दाखवत ती पर्स त्वरित दर्शन मंडप नियंत्रण कक्षात जमा केली. त्यानंतर भाविकांची ओळख पटवून संबंधित पर्स त्यांना परत करण्यात आली. सदर पर्समध्ये अंदाजे रु. 4,590/- रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. यावेळी सहायक सुरक्षा निरीक्षक प्रतीक दिवाणजी, श्रीकांत पवार तसेच सुरक्षा निरीक्षक योगेश फडके व इतर सुरक्षारक्षक उपस्थित होते.
