तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे बालाजी अमाईन्स लि., रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात पार पडले.
शिवरत्न नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित या शिबिरात तामलवाडी व परिसरातील तब्बल 600 नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली, तर 450 लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच तपासणीदरम्यान 95 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले.
या शिबिराचा उद्देश नागरिकांमध्ये नेत्र आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गरजू रुग्णांना मोफत तपासणी, चष्मे व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून अशा समाजोपयोगी उपक्रमांसाठी सर्व संस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी बालाजी अमाईन्स यांच्या निधीतून मदत देण्यात आली. शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाचे डॉ. सुधीर सुधाळ व त्यांच्या टीमने सर्व रुग्णांची तपासणी केली. शिबिरासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, प्रमुख अनिल विपत, दत्तात्रय पडणे, यशवंत लोढे, आर. सुब्बा शास्त्री (जनरल मॅनेजर) यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, अशा शिबिरांची गरज अधोरेखित झाली आहे.
