धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव अंतर्गत गुरुवर्य के. टी. पाटील फाउंडेशन वर्ग (NEET/IIT-JEE फाउंडेशन) जागतिक महिला दिन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन तसेच फाउंडेशन सखी (अलेक्सा) संकल्पनेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून डॉ. सौ. मंजुळाताई आदित्य पाटील (प्रशासकीय अधिकारी, फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल स्कूल) उपस्थित होत्या. त्यांनी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून समाजातील महिलांचे स्थान व महिला म्हणून जबाबदारी याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रो. डॉ. मनीषा असोरे विभाग प्रमुख, शिक्षण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, यांनी विद्यार्थ्यांना आजच्या समाज व्यवस्थेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या अनमोल कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे होते. त्यांनी अध्यक्ष समारोपामध्ये समाज व्यवस्था घडवण्यामध्ये समाज सुधारकांचे अनन्य साधारण मते विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशन वर्ग प्रमुख प्रा. व्ही. जी. आंबेवाडीकर यांनी केले. त्यांनी फाउंडेशन वर्गाच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी फाउंडेशन सखी (अलेक्सा) या अभिनव संकल्पनेची माहिती आदित्य सुधीर पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ) यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात द्वारे विकसित भारत अंतर्गत आयोजित बिल्डयाथॉनमधील Design Thinking and Innovationhm कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यात ईश्वरी गव्हाणे, सानवी चव्हाण, कैवल्य कवडे, श्रेयस होळकर आणि समर्थ कुटार या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीने प्रभावीपणे केले. कार्यक्रमास सौ.जी.बी. शिंदे, एस.डी.दिरगुळे, एस.बी.चव्हाण, आर. एस. जगताप, श्रीमती के.ए.यादव, कविता भोसले, सत्यप्रकाश, विशाल कुमार, कु. ज्योती यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशन वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
