धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रदेश कार्यकारणी जाहीर केली असून, त्यामध्ये मराठवाड्याला पुरेसा वाव न दिल्यामुळे फक्त नांदेड, लातूर व छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा नाही. तर मराठवाड्यामध्ये धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यांचा समावेश असताना मराठवाड्याला प्रदेश कार्यकारणीमध्ये पुरेशा वाव दिला गेला नाही याबद्दल भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी खंत व्यक्त केली आहे.
भाजप प्रदेश कार्यकारणी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केली आहे. यामध्ये 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस तर 12 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष, 1 सहकोषाध्यक्ष, 1 मुख्यालय प्रभारी, 1 मुख्यालय सहप्रभारी, 1 मुख्य प्रवक्ता या प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. तर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदासाठी चित्रा वाघ, किसान मोर्चाच्या अध्यक्षपदासाठी रामकृष्ण वेताळ, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदासाठी योगेश टिळेकर, एस.सी. मोर्चाच्या अध्यक्षपदासाठी विश्वजीत गायकवाड, एस. टी. मोर्चा अध्यक्षपदासाठी देवराव होळी, भटके विमुक्त मोर्चा अध्यक्षपदासाठी नरेंद्र पवार तर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदासाठी इद्रिस मुलतानी यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेश कार्यकारणीमध्ये मराठवाड्यातील नांदेडचे संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख आणि लातूरच्या अर्चना पाटील चाकूरकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगरचे प्रविण घुगे, रेखा कुलकर्णी यांची चिटणीस पदासाठी निवड करण्यात आली आहे.
निष्ठावंतावर अन्याय
भाजप प्रदेश कार्यकारणी जाहीर करताना असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका असोत, यामध्ये निष्ठावंतांना संधी देण्यास भाजप कमी पडत आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये खंत व्यक्त केली जात आहे. अशी प्रतिक्रिया धाराशिव जिल्ह्यातील भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष व रूपामाता उद्योग समुहाचे प्रमुख ॲड. व्यंकटराव गुंड यांनी व्यक्त केली आहे.
