तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे  श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलश मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा रविवारी शकडो माता-भगिनीं, शिवभक्त, गावातील विविध तरुण मंडळांच्या उपस्थित वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात  उत्साहात साजरा झाला. 

सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलश आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. दरम्यान पंचायत समिती सदस्य संतोष बोबडे, माजी जि.प. सदस्य राजकुमार पाटील. माजी सरपंच रामेश्वर तोडकरी आणि शिवभक्तांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन शिवआरती करण्यात आली. 

तदनंतर कलश आणि पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या भक्ती आणि शक्तीच्या या सुवर्णक्षणाने सावरगाव नगरी टाळ मृदंगाच्या गजरात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दुमदुमली होती. या अभूतपूर्व सोहळ्यात मुलींनी पारंपारिक साडी. मराठमोळे दागिने. नथ आणि कपाळावर चंद्रकोर परिधान केले होते या वेशभूषेतून मुलींनी स्वराज्य जननी माँ जिजाऊ, महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई याचे रूप सादर केले. मुलांनी धर्मवीर बाल संभाजी महाराज याच्यासह मावळ्यांची वेशभूषा परिधान करून हातात भगवे झेंडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. या परंपरा-प्रेरणा-सामाजिक एकतेच्या लोकोत्सवात सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन भक्तीपूर्ण वातावरणात हा भव्य अभूतपूर्व सोहळा पार पाडला. सायंकाळी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भव्य पालखी सोहळ्याची सांगता झाली. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पालखी आणि श्री. विठ्ठल रुक्मिणी कलश मिरवणूक सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, श्री.विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

 
Top