तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेस धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भेट देत शाळेची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या तसेच शैक्षणिक वातावरणाची पाहणी करून शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. सीईओ डॉ. घोष यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, स्वच्छता, तसेच शाळेची एकूण प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. शाळेच्या गुणवत्तापूर्ण कामकाजाचे कौतुक करत भविष्यातही शाळेने अधिक प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून सदिच्छा दिल्या. या भेटीदरम्यान धाराशिव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी पिकवने, तुळजापूर गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, पंचायत समिती सदस्य संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, काटी केंद्राचे केंद्रप्रमुख हनुमंत कदम, उपसरपंच धर्मराज शिंदे, ग्रामविकास अधिकारी भिमराव झाडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
