मुरुम (प्रतिनिधी)-श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे व्हंताळ येथे महिला मेळावा व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे  आयोजन गुरुवार  दिनांक 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. कार्यक्रमास गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती जयश्रीताई सगर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब पाटील, डॉ बनसोडे सर, डॉ. कुलकर्णी सर, श्रीमती डॉ. कोकाटे मॅडम तसेच मिलिंद पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

महिला मेळाव्यात डॉ पार्वती सावंत यांनी महिलांचे आरोग्य, पोषण, रक्ताल्पता, स्वच्छता, माता-बाल संगोपन, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली. उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांच्या आरोग्य समस्यांवर मार्गदर्शन करत नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.

आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. गरजू महिलांना औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. भारत शेळके, डॉ अनिल देशमुख, डॉ रंजना चोचंडे, प्रा ज्योती जोगदाबगे, महिला प्राध्यापक, ग्रामस्त महिला, शिबिरार्थी विद्यार्थिनी, स्वानसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रेम चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिबिरार्थी विद्यार्थिनी अमृता मुगळे हिने सर्व उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून भविष्यातही असे समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


 
Top