धाराशिव (प्रतिनिधी)- सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, प्रती गुंठा 7 ते 10 हजार रुपये मावेजा देण्याचे जाहीर केले आहे. हा मावेजा अतिशय तुटपुंजा व अत्यल्प असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. समृद्धी महामार्गासाठी जो दर दिला होता तोच दर या शेतकऱ्यांना देण्यात यावा. विशेष म्हणजे एका जिल्ह्यात अशा पद्धतीने शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही. विशेष म्हणजे बागायती जमिनी असताना त्या चक्क जिरायती दाखविलेल्या आहेत. तसेच फळे असलेल्या वृक्षाचे रूपांतर रोपांमध्ये दाखवून त्याची किंमत शून्य करण्याचा पराक्रम महसूल विभागाने केला आहे. त्यामुळे सुरत-चेन्नई ग्रान फिल्ड महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसन करून योग्य भूसंपादित होणाऱ्या जमिनीस योग्य दर देण्यासह शेतकऱ्यावरील अन्याय दूर करावा. अन्यथा हा मार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा परंडा तालुक्यातील शिरसाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच त्यांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नव्हे तर त्या सातबारा वरून शेतकरीच कोरा करण्याचे धोरण असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच ठिय्या देत धरणे आंदोलन केले. यावेळी तानाजी चोबे, विकास चोबे, ऍड. गोविंद कोठुळे, सोमनाथ कापसे, हरिश्चंद्र बारस्कर, दादा आवळे, ज्ञानेश्वर कोठुळे, हैदर शेख, विश्वास चोबे, अमन खान, नितीन नायकोडे, रणजीत लांडगे, विकास जगदाळे, शहाजी नायकोडे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
