कळंब (प्रतिनिधी)- कळंब : येथील राज्य परिवहन आगारात दि. 27 रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे वाटप करून मराठी भाषेबद्दल अभिमान आणि आदर व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख विनोद अलकुंटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मोहन जाधव उपस्थित होते. यावेळी स्थानकप्रमुख निलेश जाधव, सुरज पायाळ, प्रशांत राख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमात मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. “मराठी ही केवळ भाषा नसून आपली संस्कृती, परंपरा आणि ओळख आहे. तिचा दैनंदिन व्यवहारात सन्मानपूर्वक वापर व्हावा,” असे आवाहन मान्यवरांनी केले.
बस स्थानक परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीने प्रवाशांचे लक्ष वेधून घेत कार्यक्रमाला अधिक रंगत आणली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश गोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जोतिराम तौर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विलास जाधव, प्रभाकर झांबरे, श्रीमती प्रियंका शिंदे, आश्विनी तिडके, वाहतूक नियंत्रक सुशील हुंबे, हनुमंत मुंडे, संतोष पुरी, अलका भोसले, नामदेव जगताप, चेतन गोसावी, रामलिंग जाधवर, शाहू बाराते तसेच सर्व वाहक-चालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे आगार परिसरात मराठी भाषेचा गौरव साजरा करताना सांस्कृतिक अभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
