कळंब (प्रतिनिधी)- रणसम्राट क्रीडा मंडळ, कळंब संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळंब येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्कूल डे व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याने संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाबरोबरच आठवणींची उजळणी दिसून आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मुस्तान मिर्झा उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांच्या मागे ते पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करा. एक दिवस ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.” तसेच दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, आत्मविश्वास आणि सातत्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. परीक्षेचा ताण न घेता सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुंडे सर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शाळेची भूमिका स्पष्ट करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी भवर, उपमुख्याध्यापक सावंत, फरिहा सय्यद यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाआधी विद्यालयात स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एक दिवसासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व प्रशासकीय पदांची जबाबदारी पार पाडली. यामध्ये विद्यार्थी प्रिया रत्नपारखी यांनी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. अनुशिता हिरे यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली, तर कृष्णा जाधव यांनी उपमुख्याध्यापक म्हणून भूमिका निभावली. सच्छिदानंद कुंभार यांनी शिक्षणाधिकारी म्हणून कार्य करत शालेय प्रशासनाची जबाबदारी पार पाडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिस्त, जबाबदारी आणि प्रशासनाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.

निरोप समारंभाच्या वेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहपाठी मित्रमैत्रिणींच्या साथीत घालवलेले क्षण सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी भावनिक शब्दांत शिक्षकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर मोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन दहावीच्या  विद्यार्थिनीने प्रभावीपणे केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि भावनांच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

 
Top