धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ‌‘कुसुमाग्रज‌’ यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा  ‌‘मराठी भाषा गौरव दिन‌’ म्हणून आज उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग,जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दीपप्रज्वलन करून विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य समाधान शिकेतोड यांच्या “मुलांना वाचतं लिहितं करताना” आणि कवयित्री भाग्यश्री देवकते यांच्या “शब्दप्रभा” या कविता संग्रहाचे प्रकाशन तसेच ज्ञानकिरण सामाजिक संस्थेच्या विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच परिसंवादाचेही आयोजन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र खंदारे,सुप्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र अत्रे,युवराज नळे,जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य समाधान शिकेतोड,कवयित्री सुनिता गुंजाळ, भाग्यश्री देवकते,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे,पत्रकार अनिल आगलावे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात मराठीतच संवाद साधण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषा समिती सदस्य भैरवनाथ कानडे यांनी केले. 


 
Top