धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त किरण जाधव यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील तसेच उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.त्याअंतर्गत देवांशी प्रकाश काकडे या तृतीयपंथीय व्यक्तीस दि.१ मे २०२५ रोजी ‘आपले सरकार’ सेवा केंद्राचा परवाना देण्यात आला.या माध्यमातून तृतीयपंथीय सक्षमीकरणाचा आदर्श उपक्रम राबविण्यात येत आहे.
आयुक्त श्री.जाधव यांनी केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला असता,दि.१ मे २०२५ पासून आतापर्यंत विविध प्रमाणपत्रांचे मोठ्या प्रमाणावर वितरण झाल्याची माहिती देवांशी काकडे यांनी दिली. त्यामध्ये वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे २४९,अप्लभूधारक प्रमाणपत्रे १५,भूमिहीन प्रमाणपत्रे ७,जात प्रमाणपत्रे 102,आर्थिक दृष्ट्या मागास (राज्य) प्रमाणपत्रे ४२ व (केंद्रीय) ३६,सर्वसाधारण प्रतिज्ञापत्रे १२२,उत्पन्न प्रमाणपत्रे १ हजार ४१,श्रावणबाळ योजनेची प्रमाणपत्रे २२,नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे १५२ तसेच केंद्रीय जात प्रमाणपत्रे २४ वितरित करण्यात आल्याची नोंद आहे. तृतीयपंथीयांना संधी देत प्रशासनाने सामाजिक समावेशकतेचा आदर्श निर्माण केला असून,आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा उपलब्ध होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
