धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये धाराशिव जिल्ह्यात भाजपने निष्ठावंत लोकांना डावलून नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिल्यामुळे भाजप निष्ठावंतांनी आले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांची भेटून नाराजी दूर केल्यामुळे अनेक भाजप निष्ठावंतांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दि. 27 जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी परत घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरूध्द महायुती या प्रमाणे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगळवार दि. 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटाचा दिवस होता. त्यामुळे धाराशिव तहसील कार्यालयात विविध पक्षातून बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी भाजपचे निष्ठावंत रामदास कोळगे, डॉ. गोविंद कोकाटे यांनी जिल्हा परिषद मतदारसंघ बेंबळी आणि येडशी गटातून आपला उमेदवारी मागे घेतला. तर पाडोळी मतदार संघातून अजित गुंड, एड. शरद गुंड यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या संदर्भात बोलताना भाजपचे प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी भाजप युतीमध्ये 99 टक्के बंडखोरी होणार नाही असे सांगितले.
शिवसेनेने प्रतिष्ठेचा विषय केलेल्या पळसप मतदारसंघातून भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेतून उमेदवारी अर्ज पळसप जिल्हा परिषद मतदार संघातून दाखल केला होता. शिवसेनेच्या उद्रेकानंतर नेताजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज परत घेतला. नेताजी पाटील मुळात भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. पळसप मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख लाकाळ यांचा अखेर उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते हभप बाबुराव पुजारी यांची उमेदवारी पाडोळी जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष म्हणून कायम ठेवली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंग पाटील यांनी केशेगाव जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी अर्ज परत घेतला आहे. तर तेर जिल्हा परिषद मतदार संघातून आपली उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. एकदंर भाजप नेत्यांनी अनेकांना स्विकृत सदस्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे भाजपमधील मोठ्या प्रमाणातील बंडखोरी टळली आहे.
.jpeg)
