वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील क्रीडा संस्कृती जपणाऱ्या आणि वाढदिवसाच्या औचित्याला सामाजिक रूप देणाऱ्या शिवसेना (उबाठा) नेते प्रशांत बाबा चेडे यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाची वाशी प्रीमियर लीग सिजन 6 भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील आठ बलाढ्य संघांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला सुरुवातीपासूनच प्रचंड उत्साह लाभला. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी दमदार क्रिकेट सादर करत लीगची पातळी उंचावत नेली. प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना दिलेल्या प्रतिसादामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय बनले होते.
या भव्य स्पर्धेतील अंतिम सामना गुरुवारी दुपारी खेळवण्यात आला. पारा येथील रॉयल मित्र प्रेम क्रिकेट संघ आणि रायगड वारियर्स वाशी यांच्यात हा सामना रंगला. अखेरीस तब्बल 59 धावांनी प्रभावी विजय मिळवत वाशी प्रीमियर लीग सिजन 6 चे रॉयल मित्र प्रेम क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या पारा संघाला नितीन तात्या चेडे यांच्या हस्ते 51,111 रुपयांचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले, तर उपविजेते रायगड वारियर्स वाशी संघाला प्रसाद काका जोशी आणि दत्ता कवडे पाटील यांच्या हस्ते 31,111 रुपयांचे द्वितीय पारितोषिक देण्यात आले. या पारितोषिकांमुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आनंद अवर्णनीय होता. संघमालक अनिकेत भैय्या घरत आणि कर्णधार रोहित शेळके यांच्या नेतृत्वाखालील रॉयल मित्र प्रेम क्रिकेट संघातील संतोष चौधरी, जिवन मस्के, दिपक सिरसट, प्रदीप शिनगारे, शंकर तोडकर, आशिष उंदरे, विशाल खवले, अमोल कवडे, सुरज कवडे, अक्षय कवडे आणि सुरज जाधव या खेळाडूंनी संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
स्पर्धेतील विशेष सन्मानांमध्ये तुषार उंदरे यांना बेस्ट बॉलर, विनोद बोराडे यांना बेस्ट बॅटसमन तर प्रदर्शनात सर्वांगीण चमक दाखवणाऱ्या प्रदीप शिनगारे यांना मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट आयोजन, मैदानावरील सजावट, प्रेक्षकांसाठी केलेली सोय, पंचांची शिस्तबद्ध कामगिरी आणि आयोजक मंडळाचे सुयोग्य नियोजन यांमुळे वाशी प्रीमियर लीग सिजन 6 विशेष ठरली. रॉयल मित्र प्रेम पारा संघाच्या या शानदार विजयानंतर संपूर्ण तालुक्यात त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या या यशाने तालुक्यातील क्रिकेटप्रेमी तरुणांना मोठी प्रेरणा मिळाली आहे. पुढील वर्षीची वाशी प्रीमियर लीग आणखी भव्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
