नळदुर्ग (प्रतिनिधी)- गेल्या वर्षीच्या उस गळीत हंगामातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे बील दिले नसल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी गोकूळ शुगर धोत्री ता. दक्षिण सोलापूर येथील कारखान्याच्या उस वाहतुक करणाऱ्या गाडया फोडल्याची घटना मैलारपूर खंडोबा मंदीर परिसरात घडली. यामुळे शेतकऱ्यांचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे गोकूळ शुगर यांनी तात्काळ शेतकऱ्यांची उस बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अन्यथा शेतकऱ्यांचे उस आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या वर्षी नोव्हेबर 2024 मध्ये नळदुर्ग, येडोळा, वागदरी, शहापूर, दहीटणा, आदी भागातील शेतकऱ्यांनी गोकूळ शुगर धोत्री ता. दक्षिण सोलापूर या कारखान्यास उस घातला होता. दरम्यान गेल्या वर्षीचा गळीत हंगाम संपून दुसरा हंगाम सुरु होत आला असताना ही नळदुर्ग, शहापूर, दहिटणा, येडोळा, वागदरी आदी भागातील शेतकऱ्यांना उसाचे बील दिले नाही. परिणामी शेतकरी उस बील मागणी करीता कारखान्यावर गेले असता तेथे शेतकऱ्यांना कारखान्याचे मालक भेटत नाहीत, पैशा संबंधी विचारले असता टोलवा टोलवीची उत्तरे दिली जात होते. त्यामुळे कांही शेतकऱ्यांना पाचशे रुपये प्रति टन, कांहीना हजार रुपये प्रति टन, कांही शेतकऱ्यांना दीड हजार प्रति टन आणि कांही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रति टन उसाचे बील दिले आहेत. मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांना एक रुपया ही उसाचे बील दिले नाही. त्यामुळे गोकूळ शुगरच्या विरोधात शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येणाऱ्या सहा तारखेस गोकूळ शुगरचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम होणार असल्याने गोकूळ शुगर धोत्री येथील कारखान्याच्या उस वाहतुक करणाऱ्या गाडया व टोळया सध्या नळदुर्ग, येडोळा, शहापूर, गुजनूर, वागदरी, शहापूर आदी भागात येत आहेत. दरम्यान येथील मैलारपूर खंडोबा मंदीर परिसरात कांही उस वाहतुक करणाऱ्या उसाच्या ट्रक उस तोडणीसाठी आलेल्या आसताना गोकुळ शुगर ने गेल्या गळीत हंगामातील उसाचे बील दिले नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी तीन च्या सुमारास उस वाहतुक करणारी ट्रक क्रमांक एम एच 25 एयु 0316 या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. यामुळे गोकूळच्या गाडया परिसरात दिसताच शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होत असून गोकूळ शुगरने येत्या दोन दिवसात उस बीले देण्यात यावीत अशी मागणी होत आहे. अन्यथा गोकूळ शुगरच्या उस वाहतुक करणाऱे वाहन परिसरात किंवा ग्रामीण भागात फिरु देणार नाहीत. शिवाय स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांच्या आवाहनानुसार गोकूळच्या गाडया परिसरात फिरु दिल्या जाणार नाहीत आणि गाडया आल्या तर त्या फोडल्या जातील असा इशारा ही संतापलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

 
Top