तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील असून, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वसतिगृह फी माफ करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनात पालकांनी म्हटले आहे की,आमच्या शेतीचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहेत. घरातील आमच्या मुलांची शैक्षणिक साधने पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे आमच्यासमोर आर्थिक अडचणींचे मोठे संकट उभे राहिले आहे.”
शाळेतून द्वितीय सत्राच्या वसतिगृह फी भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र,“सध्याच्या परिस्थितीत फी भरणे अशक्य झाले असून,आमच्या मुलांचे शिक्षण अबाधित राहावे यासाठी फी माफ करून दिलासा द्यावा,”अशी भावनिक मागणी पालकांनी केली आहे. हे निवेदन दत्ता हुंडेकरी सोमनाथ माळी चंद्रसेन पाटील प्रार्थना कदम सह अनेक पालकांच्या स्वाक्षरी आहेत.